

यवतमाळ : सतत मद्यप्राशन करून पत्नीला मारहाण करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून खून केला. नेर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमरावती-यवतमाळ राज्य महामार्गानजीकच्या कोलुरा येथील रामनाथ महाराज मंदिराजवळ आज बुधवारी सकाळी ही घटना घडली.
शंकर मसाराव मस्के (वय ३५, रा. कुंभारी, पुसद) असे मृत जावयाचे नाव आहे. या प्रकरणात नेर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या अर्ध्या तासातच खुनाचा छडा लावला असून, आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.
बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कोलुरा येथील दिलीप देशमुख यांच्या खुल्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती नेर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात खुनाचा आरोपी शोधून काढला. मृताचा सासरा आरोपी रामनाथ किशनराव कवडे (वय ५५, रा. कोलुरा) याने पोलिसांसमोर स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली.
मृत शंकर मस्के हा आरोपी रामनाथ कवडे यांचा जावई होता. शंकर हा दररोज दारूच्या नशेत धुंद होऊन आपल्या पत्नीला बेदम मारहाण करत होता. जावयाच्या या रोजच्या छळाला आणि दारूच्या व्यसनाला संपूर्ण कुटुंब पूर्णपणे कंटाळले होते. बुधवारी सकाळी याच वादातून संतप्त झालेल्या रामनाथ कवडे यांनी शंकर मस्के याच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. हा वार इतका भीषण होता की, शंकरचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने कुऱ्हाड शेतात फेकून देऊन पळ काढला होता. परंतु, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक लॅबच्या (न्यायवैद्यक प्रयोगशाळा) पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत.
आरोपी रामनाथ कवडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश आडे, जमादार राहुल काटकर, नीतेश राठोड आणि यादवराव जाधव यांनी पार पाडली.