Yavatmal Crime : ‘तुमचे पैसे खाली पडले...’ म्हणत भरदिवसा बँकेसमोरूनच शेतकर्‍याला चार लाखांना लूटले, मीरा येथील घटना

Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : ‘तुमचे पैसे खाली पडले... अशी दिशाभूल करीत शेतकऱ्याची चार लाख रुपयांची पिशवी लंपास केली. ही धक्कादायक घटना पांढरकवडा शहरातील एचडीएफसी बँकेसमोर घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील मीरा (जिरा) येथील शेतकरी गजेंद्र सदाशिव राठोड (वय 45) हे शनिवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजता पांढरकवडा येथील एचडीएफसी बँकेत आले होते. त्यांनी गृहकर्जासाठी घेतलेल्या खात्यातील चार लाख रुपये काढले.

पैसे काढल्यानंतर ते अकराच्या सुमारास बँकेबाहेर आले. राठोड यांनी आपल्या मोटारसायकलच्या (क्र. एमएच 29 सीई 4198) पेट्रोल टाकीवरील डिक्कीत पैशांची कापडी पिशवी ठेवली होती. याचवेळी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी कट रचला. एका युवकाने ‘तुमचे पैसे खाली पडले आहे‘ असे सांगत राठोड यांचे लक्ष दुसरीकडे वळविले. हे ऐकताच राठोड घाईघाईने मोटारसायकलवरून खाली उतरून पडलेले पैसे शोधू लागले.

याच संधीचा फायदा घेत दुसर्‍या आरोपीने मोटारसायकलवरील चार लाख रुपयांची पिशवी क्षणार्धात उचलली आणि साथीदारासह दुचाकीवरून पोबारा केला. संपूर्ण घटना काही क्षणांत घडल्याने राठोड यांना काही समजण्याआधीच आरोपी फरार झाले. घटनेनंतर गजेंद्र राठोड यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक नितीन सुशीर या प्रकरणाचा तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, बँकेतून मोठी रक्कम काढताना नागरिकांनी सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच पैशांची सुरक्षितता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news