

यवतमाळ : शेतजमिनीचा सातबारा आणि फेरफार नावावर करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका भ्रष्ट महसूल अधिकाऱ्याला यवतमाळच्या विशेष न्यायालयाने आज मंगळवारी मोठा दणका दिला आहे. बाभूळगाव येथील तत्कालीन तलाठी संजय नक्षणे याला ७ वर्षे सश्रम कारावास आणि ३ लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यवतमाळ येथील फिर्यादी संदीप रामदास गुल्हाणे यांना त्यांच्या शेताचा फेरफार आणि सातबारा उतारा हवा होता. हे शासकीय काम करण्यासाठी तत्कालीन तलाठी संजय नक्षणे याने लाचेची मागणी केली. भ्रष्टाचाराला बळी न पडता फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली आणि बाभूळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा न्यायाधीश-१ व विशेष न्यायाधीश एस. यु. बघेले यांच्या न्यायालयात या प्रकरणाची दीर्घ सुनावणी झाली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्याला ७ वर्षे सश्रम कारावास, ३ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच जमा होणाऱ्या दंडाच्या रकमेतून ५ हजार रुपये फिर्यादीला देण्याचे निर्देश न्यायालयने दिले. तसेच दोषी आरोपीला दंड न भरल्यास १ वर्ष ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणात सरकारी वकील नरेंद्र पांडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी गोवर्धन वाढई यांनी सहकार्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला होता.
महसूल विभागातील एका जबाबदार पदावर असताना सर्वसामान्य शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या तलाठ्याला झालेली ही शिक्षा इतर लाचखोरांसाठी मोठा धडा मानली जात आहे. सरकारी काम करण्यासाठी लाच मागणाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्यास न्याय मिळतो, हेच या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.