Yavatmal Crime : हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ करणाऱ्या पोलिस पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

लग्नानंतर छळ आणि पतीचे पलायन, विवाह सोहळ्यातच झाली वाहनाची मागणी
Yavatmal Crime : हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ करणाऱ्या पोलिस पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
Published on
Updated on

यवतमाळ : सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची वरदक्षिणा स्वीकारल्यानंतरही, चारचाकी वाहन व आणखी दागिन्यांची मागणी करून नवविवाहितेचा छळ करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घाटंजी तालुक्यातील आमडी येथे समोर आला आहे. लग्नानंतर अवघ्या महिन्याभराच्या आतच नवविवाहितेचा आर्थिक व मानसिक छळ केल्याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यवतमाळ पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या पतीसह सासरच्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पती अशोक राठोड (वय ३८), सासरे रामधन राठोड (वय ६०), सासू ललिता राठोड (वय ५२, सर्व रा. आमडी, ता. घाटंजी) तसेच देविदास पवार (वय ६६, रा. येरद) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विवाह सोहळ्यातच झाली वाहनाची मागणी

तक्रारीनुसार, विवाह निश्चित झाल्यानंतर वधूपक्षाकडून वराला ४० ग्रॅम सोन्याचे दागिने देण्यात आले होते. याशिवाय २४ मार्च २०२६ रोजी वरदक्षिणा म्हणून एक लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर २४ एप्रिल २०२६ रोजी कारंजा येथील देशमुख मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. मात्र, विवाह सोहळा सुरू असतानाच वरपक्षाकडून चारचाकी वाहन आणि आणखी सोन्याचे दागिने देण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर हा विवाह पार पडला.

लग्नानंतर छळ आणि पतीचे पलायन

लग्न झाल्यानंतरही सासरच्या मंडळींकडून मागण्यांचा पिच्छा सोडण्यात आला नाही. ‘आमच्या अपेक्षेप्रमाणे काहीच दिले नाही’ असे म्हणत सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेला सतत मानसिक त्रास देऊन टोमणे मारण्यात आले. तसेच पतीने सहजीवन टाळल्याचाही गंभीर आरोप पीडितेने केला आहे. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर, ५ मे रोजी पती अशोक राठोड हे अचानक घराबाहेर पडले ते परत आलेच नाहीत. पती निघून गेल्यावर सासरच्या उर्वरित मंडळींकडून पीडितेला अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

अन्य महिलेशी संबंध असल्याचा आरोप

याच काळात पतीचे अन्य एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आल्याचा दावा देखील नवविवाहितेने आपल्या तक्रारीत केला आहे. लग्नावेळी देण्यात आलेले सोन्याचे दागिने व अन्य स्त्रीधन परत मागितले असता, सासरच्यांनी ते देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने पोलिसात धाव घेतली. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news