

यवतमाळ : किरकोळ वादातून एका इसमाचा खून केल्याची घटना दारव्हा तालुक्यातील वागद येथे सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) उघडकीस आली. याप्रकरणी लाडखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
तुळशीराम कसंदास राठोड (वय ५५) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी शुभम ऊर्फ पवन उत्तम चव्हाण (वय २५) याला अटक केली आहे. मृत तुळशीराम व आरोपीचे वडील उत्तम चव्हाण यांच्यात रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) रात्री वाद झाला होता. त्यानंतर आरोपी शुभमने, 'वडिलांशी वाद का केला?' असे विचारत तुळशीराम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने तुळशीराम यांचा मृत्यू झाला.
शुभमने केलेल्या मारहाणीमुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताचा मुलगा आनंदा राठोड याने लाडखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला, तसेच आरोपी शुभम चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास बीट जमादार आशिष अवझाडे करीत आहेत.