Yavatmal News | यवतमाळ : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला आठ वर्षाचा कारावास

Court News
Court NewsPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाचा निकाल दिला.

विजय दामोधर जांभोरे (वय 41, रा. कोलुरा, ता. नेर, जि. यवतमाळ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नेर तालुक्यातील कोलुरा येथे 28 जून 2022 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास फिर्यादी जयश्री सुखदेवे व मृत शुभांगी जांभोरे यांचा मुलगा शौर्य हे अमरावती येथून कोलुरा येथे आले होते. त्या दिवशी मृत शुभांगीची मोठा मुलगा अनिरुद्धची शाळा सुरू झाल्याने त्याला नेण्यासाठी तयारी सुरू होती.

दरम्यान, आरोपी पती विजय घरी आला. शुभांगीला मजुरीचे पैसे का खर्च केले आणि मुलगा अनिरुद्धला घ्यायला कोलुरा येथे का आली, असे विचारून  रागाच्या भरात लोखंडी गजाने शुभांगीच्या डोक्यावर वार केले. यामध्ये शुभांगीचा मृत्यू झाला. घटनेनंतर या प्रकरणी जयश्री सुखदेवे यांनी नेर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस अधिकारी व पोलिस उपनिरीक्षक गजानन अजमिरे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची पेशी घेण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून फिर्यादी, मृताचा मुलगा, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. मंगेश एस. गंगलवार यांनी काम पाहिले. तर तपास अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक गजानन अजमिरे आणि साहाय्यक अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर इंगळे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news