

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ९ फेब्रुवारीला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होत आहे. त्या दृष्टीने राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दोन सहकार दिंड्या निघालेल्या आहेत. आज ३० जानेवारीला नागपूरहून आलेल्या दिंडीची शोभायात्रा पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी हिरवी झेंडे दाखवून पुढे मार्गक्रमण करती झाली. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सहकारा शिवाय राज्य व समाजाचा विकास अशक्य आहे असे विधान पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.
या दिंडीत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चा रथ, हरिपाठ मंडळ, विविध पतसंस्थांचे दहा रथ, ५०० पेक्षा अधिक मोटरसायकलस्वार, शेकडो महिला, सर्वांनी फेटे व सहकाराचा दुपट्टा परिधान करून मोठ्या जल्लोषात दिंडीत सहभाग घेतला. सहकार भवन ते संविधान चौक, हनुमान आखाडा, पाच कंदील चौक, गोधनी रोड, दाते कॉलेज चौक करीत ही दिंडी पुन्हा सहकार भवन वडगाव येथे पोहोचली. या ठिकाणी सहकार दिंडी सोबत आलेल्या पुणे येथील कलावृंदांनी सहकार या विषयावरील सुंदर नृत्य व पथनाट्य सादर केले.
याप्रसंगी झालेल्या सभेला जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, राज्य फेडरेशनचे मुख्य समन्वयक राजुदास जाधव, संचालक सुदर्शन भालेराव, धनंजय तांबेकर आदींनी संबोधित केले. यवतमाळ जिल्हा फेडरेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा अर्बन बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, जिल्हा फेडरेशनचे सचिव नीरज डफळे, संचालक प्रदीप झाडे, लक्ष्मण घोटेकर, दिगंबर जगताप, अशोक जयसिंगपूरे, लोकमान आजम, अर्चना माळवी, अजय दंडे, राम साखळे, अमोल बोदडे, रवी इंगळे, रवी महानूर आदी उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी, हरिनामाचा जयघोष, सहकाऱ्यांच्या प्रचंड घोषणांनी यवतमाळ शहर दुमदुमून गेले होते. सहकार क्षेत्रातील सर्व बँका, पतसंस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सहकार दिंडी प्रचंड यशस्वी केली त्याबद्दल जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी सर्वांना धन्यवाद दिले.