

यवतमाळ: शहरात नवरात्र उत्सवाचा जागर सुरू असतानाच यवतमाळमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता जांब रोडवर ही घटना घडली. अवधुतवाडी पोलिसांच्या डिबी पथकाने आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले.
मृत तरुणाचे नाव गौरव विलास बावने (वय २७) असून, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव स्वप्नील दत्तात्रय सुलभेवार (वय ३७) असे आहे. गौरव बावने यांची जांब रोडवर पानटपरी होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनीच दुसरी टपरी अग्रवाल नावाच्या व्यक्तीला बनवून दिली होती. मात्र, ती टपरी स्वप्नील सुलभेवार चालवू लागला व त्याने पुढे ती दुसऱ्या चहा टपरीवाल्याला भाड्याने दिली. या भाड्याच्या वादातून गौरव व स्वप्नील यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता.
मंगळवारी सकाळी हा वाद विकोपाला गेला. गौरव व त्यांचे वडील विलास बावने जांब मार्गावर उभे असताना स्वप्नीलने शिविगाळ करीत गौरववर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विलास बावने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी स्वप्नीलविरोधात गुन्हा दाखल करून काही तासांतच त्याला अटक केली.
सहा दिवसांत दुसरा खून
शहरात गेल्या सहा दिवसांत ही दुसरी हत्या आहे. यापूर्वी शिविगाळ केल्याच्या कारणावरून भाडेकरूने घरमालकाची गळा आवळून हत्या केली होती. ही घटना शहरातील लोहारा परिसरातील मठाजवळ घडली होती.