

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा उस भरुन घेवून जाणारी बैलगाडी अंगावरून गेल्याने एका १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी महागाव तालुक्यातील सवना येथे घडली.
रामेश्वर अशोक पवार (वय १२ रा. सवना) असे मृत बालकाचे नाव आहे. आज बुधवारी सकाळी नॅचरल शुगर कारखान्याचे ऊस तोडणी कामगार आपापल्या बैलगाड्या ऊस तोडणीसाठी वाकोडी शिवारात घेवून गेल्या होत्या. ऊस तोडून बैलगाड्या कारखान्यात आणत होत्या. सवना या गावाला लागून असलेल्या नाल्याजवळ अशोक पवार या ऊस तोडणी कामगाराचा मुलगा रामेश्वर हा सायकलने समोर जात होता. अशातच रामेश्वरच्या सायकलची चेन पडली. त्यामुळे तो चेन बसवीत होता. दरम्यान पाठीमागून भरलेली बैलगाडी त्याच्या अंगावरुन गेल्याने छातीला गंभीर मार लागला. त्याला सवना येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टर एस. एन. लाभाटे यांनी रामेश्वरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृतकचे वडील अशोक पवार यांनी महागाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी बैलगाडी चालक सय्यद अली सय्यद नाशीर याला अटक केली. पुढील तपास पोलीस जमादार निलेश पेंढारकर, गजानन खरात करीत आहे.
अशोक पवार हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत. त्यांना एक तपानंतर म्हणजे बारा वर्षांनी मुलगा झाला होता. पण आज अचानक रामेश्वरचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. रामेश्वरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.