Yavatmal Accident : काळाचा घाला! जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत ५ ठार; दारव्हात दोन सख्ख्या भावांचा अंत

Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

यवतमाळ : जिल्ह्यात मंगळवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये पाच जणांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला. दारव्हा-आर्णी मार्गावर बस आणि दुचाकीच्या धडकेत दोन सख्ख्या भावांसह तिघांचा, तर पुसद शहरातील नव्या पुलावर १६ चाकी ट्रकखाली दुचाकी आल्याने दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे मृतांच्या गावांवर शोककळा पसरली आहे.

दारव्हा-आर्णी मार्गावर बस-दुचाकीची धडक : तिघांचा अंत

दारव्हा-आर्णी मार्गावरील सायखेडाजवळ एसटी बस (क्रमांक एमएच ४० एन ९९८३) आणि दुचाकी (क्रमांक एमएच १४ जे ९२३८) यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) येथील किशोर रामराव चव्हाण (वय ३३), दीपक रामराव चव्हाण (वय २८) आणि कुणाल लक्ष्मण पवार (वय १६) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. किशोर आणि दीपक हे दोघे सख्खे भाऊ होते. या अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रामगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुसदमध्ये १६ चाकी ट्रकखाली दुचाकी चिरडली; दोघे ठार

दुसरा अपघात पुसद शहरातील नव्या पुलावर मंगळवारी सकाळी घडला. एमएच २९ सीए ५१३२ क्रमांकाची दुचाकी नव्या पुलावरून जात असताना १६ चाकी ट्रकच्या (क्रमांक एमएच ३७ टी ०८१८) चाकाखाली आली. या भीषण दुर्घटनेत पुसद येथील यादव टारफे यांचा जागीच मृत्यू झाला; तर गंभीर जखमी झालेले युसूफ शाह चांद शाह ऊर्फ बाबा (वय ४५) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघातानंतर पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त केला असून चालक सय्यद अथर अली सय्यद युसूफ अली (रा. पुसद) याला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news