

यवतमाळ: मागून आलेल्या भरधाव कारने दोन दुचाकी वाहनांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. वणी-घुग्गूस मार्गावरील पुनवट गावापासून काही अंतरावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
या भीषण अपघातात वणी येथील विजय जनार्धन धोबे व रवी मंगेश कोहळे हे दोघे जागीच ठार झाले. तर गौरव महेंद्र निब्रड (वय १५) व महेंद्र तुळशीराम निब्रड (वय ४०) रा. दोघेही पुनवट हे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत.
हे चारही जण दोन दुचाकीने वणीकडे येत होते. पुनवट गावाजवळ येताच मागाहून आलेल्या भरधाव कारने जबर धडक दिली. विजय व रवी जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील बापलेक गंभीर जखमी झाले. त्यापैकी गौरव निब्रड याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर ठाण्याचे एपीआय धीरज गुल्हाने हे पथकासह घटनास्थळी पोहचले. जखमींना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.