Yavatmal lightning strike| यवतमाळमध्ये विजेचा तडाखा! : मेंढपाळासह ११ शेळ्यांचा जागीच मृत्यू

मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
Published on
Updated on

यवतमाळ : जंगल परिसरात बकर्‍या चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळावर अचानक वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या ११ शेळ्याही दगावल्या. वणी तालुक्यातील चिखली टाकळी परिसरात आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. निसर्गाच्या रौद्र रूपाने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

विलास तुमराम हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी व मेंढपाळीच्या व्यवसायातून करत होते. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी सकाळी बकर्‍यांचा कळप घेऊन जंगल व शेतशिवार परिसरात चराईसाठी गेले होते. दुपारच्या सुमारास वातावरणात बदल झाला. काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली.

पावसापासून बचावा करण्यासाठी विलास शेळींच्या कळपासह झाडाखाली उभा होता.  अचानक विजेचा प्रचंड तडाखा शेळींच्या कळपावर पडला. या दुर्घटनेत विलास तुमराम यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या ११ शेळ्याही मृत्युमुखी पडल्या. घटनेची माहिती मिळताच गावकरी व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली.

एकीकडे कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याचे दुःख, तर दुसरीकडे उपजीविकेचे साधन असलेल्या शेळ्यांचा झालेला मृत्यू यामुळे तुमराम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे टाकळीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची नागरिकांकडून होत आहे. निसर्गाच्या एका क्षणिक प्रकोपाने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news