

यवतमाळ : पुसद येथून वाशीममार्गे पुण्याकडे जाणार्या प्रवासी वाहनाचा शनिवार दि. 21 नोव्हेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास पुसद तालुक्यातील खंडाळा घाटातील मारवाडी फाट्यायाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास 40 ते 45 प्रवासी प्रवास करीत होते. तर 34 प्रवासी जखमी झाले असून, आठ गंभीर जखमी प्रवाशांना यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुसद येथून एमपी 70, झेडडी-7508 क्रमांकाचे प्रवासी वाहन शनिवारी रात्री पुण्याच्या दिशेने निघाले होते. या ट्रॅव्हल्समधून अंदाजे 40 ते 50 प्रवासी प्रवास करीत होते. अशात खंडाळा घाटातील मारवाडी फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या पलटी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले.
या अपघाताची माहिती खंडाळा पोलिसांना देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले होते. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात जवळपास 34 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना पुसद उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर गंभीर जखमी झालेल्या आठ प्रवाशांना पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.
जखमीमध्ये शादाब शेख रशीद (वय 27, रा. छत्रपती संभाजीनगर), कौशल्या नागोराव जाधव (वय 40, रा. शिळोना), ज्ञानेश्वर मारुती माने (वय 30, चिखली), तसलीम बी. साबीर (वय 40, रा. बेलोरा), गुलाब शेख मंजूर (वय 35, रा. बेलोरा), शुभम भारत चव्हाण (वय 25, रा. शिळोना), अर्चना सुमेध धुळधुळे (वय 26, रा. बेलोरा) आणि बेबीबाई गंगाराम गजभार (वय 55, रा. काकडदाती) यांचा समावेश आहे. अपघातातील किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास खंडाळा पोलिस करीत आहे.