

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
नवरात्रोत्सवानिमित्त यवतमाळ येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या दाम्पत्याचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा तरुण मुलगा आणि नातेवाईक थोडक्यात बचावले आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी यवतमाळ–पांढरकवडा मार्गावरील चापडोह चौफुलीजवळ घडली.
रवींद्र बबनराव शास्त्रकार (वय ४६) व जयश्री रवींद्र शास्त्रकार (वय ३७, रा. अकोली खुर्द, ता. पांढरकवडा) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
अकोली खुर्द येथील शास्त्रकार आणि कायरकर कुटुंबीय शुक्रवारी सायंकाळी चारचाकी वाहनाने देवीच्या दर्शनासाठी यवतमाळ शहरात आले होते. रात्रभर शहरातील विविध ठिकाणच्या देवींचे दर्शन घेतल्यानंतर, शनिवारी पहाटेच्या सुमारास ते सर्वजण वाहनाने आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी निघाले. यवतमाळ तालुक्यातील चापडोह चौफुलीजवळ आले असता, वाहन चालवत असलेल्या रवींद्र शास्त्रकार यांना अचानक डुलकी लागली. त्यामुळे भरधाव वाहनावरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उलटली.
या भीषण अपघातात रवींद्र आणि त्यांची पत्नी जयश्री हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी पती-पत्नीला मृत घोषित केले. या अपघातात त्यांचा मुलगा तेजस रवींद्र शास्त्रकार (वय २०) याच्यासह मनीषा प्रशांत कायरकर (वय ३०) आणि श्रेयश प्रशांत कायरकर (वय ९) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.