

यवतमाळ : अपघातात जखमी मोठ्या मुलावर नागपूर येथे उपचार सुरू असताना लहान मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. एकाच रात्रीत घडलेल्या दोन घटनांनी माळीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वणी शहरातील माळीकर कुटुंबातील अद्वैत विजय माळीकर (वय २७) असे मृत लहान मुलाचे नाव असून मोठा मुलगा श्रेयशवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. शुक्रवारी रात्री श्रेयश माळीकर (वय ३०) हा दुचाकीने कामाला जात असताना निळापूर-ब्राह्मणी मार्गावर अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्यासोबत आईवडील गेले. श्रेयशवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याच रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव शिवारातील रेल्वे मार्गावर मालगाडीची जबर धडक बसल्याने अद्वैतचा जागीच मृत्यू झाला.
मोठ्या मुलाच्या अपघाताने आधीच संकटात असताना लहान मुलगा अद्वैतच्या निधनाची बातमी कानावर पडताच आईवडिलांना प्रचंड धक्का बसला. ते श्रेयशला रुग्णालयात सोडून तत्काळ वणीला पोहोचले. एका कुटुंबातील दोन भावांवर काही तासांच्या अंतराने संकट कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच, रेल्वे व वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे वणी शहरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.