यवतमाळ : भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीच्या शेतजमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून नागपूर येथील व्यक्तीला २१ लाख ३४ हजार रुपयांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश उखर्डा म्हसाये (रा. छत्रपतीनगर, नागपूर) यांना या प्रकरणातील मध्यस्ती राजेंद्र नत्थुजी चिकटे आणि देवीदास वामन आंबेकर (दोघेही रा. आनंदवन चौक, वरोरा) यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सुर्ला येथील जवळपास अडीच एकर शेताचा सौदा करून दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज देवराव दानव (रा. एकार्जुना, ता. वरोरा) आणि प्रवीण गणपत डाहुले (रा. पिसदुरा, ता. वरोरा) यांच्या सामायिक नावाने असलेल्या सातबाराच्या आधारे २६ नोव्हेंबर २०१९ मध्ये ही खरेदी करण्यात आली. त्या मोबदल्यात रमेश म्हसाये यांच्याकडून शेताचे मूल्य म्हणून २१ लाख ३४ हजार रुपये घेण्यात आले. खरेदीखत झाल्यानंतर याची नोंदणी करण्यासाठी हे प्रकरण महसूल विभागाकडे गेल्यानंतर ही जमीन भूदान यज्ञ मंडळ, नागपूरच्या मालकीची असून यातील आरोपी मनोज दानव, प्रवीण डाहुले यांना विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी माहिती रमेश म्हसाये यांना मिळाली.
आपली फसगत झाल्याचे कळताच रमेश म्हसाये यांनी आरोपीकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र आरोपी उडवाउडवीची उत्तर देत होते. शेवटी रमेश म्हसाये यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दिल्यावर चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास ठाणेदार संजय सोलंकी यांच्या मार्गदर्शनात जमादार दिग्विजय किनाके करीत आहेत.