

यवतमाळ : करंजीवरून मारेगावकडे जात असलेल्या भरधाव पिकअपने दुचाकीला उडविल्याने दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील वणी-करंजी मार्गावरील शिवनाळा फाट्याजवळ बुधवारी रात्री घडली. या भीषण अपघातात रवींद्र रामकृष्ण अवताडे, (वय ३५) हा जागीच ठार झाला, तर अतुल वसंत किनाके (२८) दोघेही रा. खडकी, ता. मारेगाव याचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे मृत्यू झाला. दोन मित्रांचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने खडकी गावावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शेतकरी रवींद्र अवताडे यांचे शेत मारेगाव ते करंजी महामार्गावरील राज्य शिवनाळा फाट्यालागत आहे. रवींद्र आणि त्याचा मित्र अतुल हे एमएच २९ डब्ल्यू २७७९ या मोटारसायकलने शेतात जात असताना हा अपघात. झाल्याची माहिती मिळाली. याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, यात रवींद्रचा जागीच मृत्यू झाला. मित्र अतुल याचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.