यवतमाळ पोलिस रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत 16 लाखांचा गुटखा आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.27) ८ वाजता बाभूळगाव तहसील कार्यालयाजवळ करण्यात आली. अमरावतीवरून बाभूळगाव मार्गे कळंबकडे जात असलेला टेम्पो येथील तहसीलजवळ थांबविण्यात आला. टेम्पो चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने वाहनाची तस्करी तपासणी करण्यात आली. त्यात गुटखा असल्याचे निदर्शनास आले. वाहन पोलिस ठाण्यात आणून अन्न औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली.
या टेम्पोत 16 लाख ८५ हजार 200 रुपयांचा गुटखा आढळून आला. गुटखा आणि वाहन, असा २१ लाख ८५ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी इम्रान खान समीर खान (३४) व रिहान खान (रा. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागातील एस. आर. सुरकर यांनी घटनेची तक्रार नोंदविली. पुढील कारवाई पोलिस निरीक्षक लहू तावरे यांनी पार पाडली.