

यवतमाळ : ट्रॅक्टर उलटल्याने ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घाटंजी तालुक्यातील येळाबारा मार्गावरील कान्होबा टेकडीजवळ बुधवारी (२३ सप्टेंबर) ही घटना घडली.
दत्ता लक्ष्मण बोट्रे (वय ७०, रा. कोंडझरी) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोट्रे हे घाटंजीहून कोंडझरीकडे पायी जात होते. कान्होबा टेकडीजवळ गावाच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर दिसताच त्यांनी चालकाला थांबवून गावात सोडण्याची विनंती केली. चालकाने ट्रॅक्टर थांबवून तो खाली उतरला. ट्रॅक्टर उतारावर उभा असताना बोट्रे त्यावर चढू लागले. त्याच वेळी त्यांचा पाय चुकून क्लचवर पडल्याने ट्रॅक्टर अचानक मागे सरकला. काही अंतर गेल्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला. यामध्ये बोट्रे हे ट्रॅक्टरखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गणेश विसर्जनासाठी हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोंडझरी गावाकडे जात होता. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. ट्रॅक्टर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.