

Tipeshwar Wildlife Sanctuary Latest News
प्रशांत भागवत
उमरखेड: यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याने व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिले आहे. येथील 'टी-३' नामक वाघिणीने एकाच वेळी तब्बल सहा बछड्यांना जन्म देण्याची दुर्मिळ घटना घडली आहे. या बछड्यांना मानवी हस्तक्षेपापासून आणि संभाव्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी वनविभागाने तब्बल अडीच वर्षे ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवली होती. आता हे सहाही बछडे मोठे होऊन स्वतंत्रपणे जंगलात वावरू लागल्याने वनविभागाने या यशस्वी मोहिमेची माहिती उघड केली आहे.
अडीच वर्षांचे 'ऑपरेशन सिक्रेट'
साधारणपणे वाघीण दोन ते चार बछड्यांना जन्म देते. मात्र, २०२२ च्या अखेरीस टिपेश्वरमधील 'टी-३' वाघिणीने सहा बछड्यांना जन्म दिला. यापूर्वी याच वाघिणीने एकदा चार आणि नंतर पाच बछड्यांना जन्म दिल्याचा अनुभव होता. त्यामुळे सहा बछड्यांच्या जन्मानंतर वनविभागाची जबाबदारी अधिकच वाढली होती. ३ जानेवारी २०२३ रोजी ही वाघीण तिच्या सहा लहानग्या बछड्यांसह पहिल्यांदा 'कॅमेरा ट्रॅप'मध्ये कैद झाली. यानंतर तात्काळ तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी या घटनेची गोपनीयता पाळण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांची गर्दी आणि व्याघ्रदर्शनासाठी होणारा राजकीय दबाव यांमुळे बछड्यांच्या नैसर्गिक वाढीत अडथळा येऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश होता. नागपूरजवळील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांच्या गर्दीमुळे वाघिणीच्या संगोपनात आलेल्या अडचणींचा अनुभव लक्षात घेता, टिपेश्वरमध्ये अधिक खबरदारी घेण्यात आली.
संवर्धनासाठी उचललेली पाऊले
वाघिणीला आणि तिच्या सहा बछड्यांना सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान होते. यासाठी वनविभागाने एक सुनियोजित रणनीती आखली होती. वाघिणीचा वावर असलेला अभयारण्याचा मोठा परिसर 'कोअर झोन' म्हणून पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. नाईट व्हिजन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या कुटुंबावर २४ तास नजर ठेवण्यात आली. वनविभागातील कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या मोहिमेची गुप्तता जपली. बछड्यांना कोणताही मानवी त्रास होणार नाही आणि त्यांचे संगोपन नैसर्गिक पद्धतीने होईल, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावर दुर्मिळ घटना
भारतात वाघिणीने सहा बछड्यांना जन्म देण्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. यापूर्वी २०१४ मध्ये बिहारमधील 'वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात' अशी घटना नोंदवली गेली होती. त्यानंतर थेट टिपेश्वरमध्ये याची पुनरावृत्ती झाली आहे. वाल्मिकीप्रमाणेच टिपेश्वरमधील हे सहाही बछडे पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ वाढले असून, आता ते अडीच ते तीन वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपापला स्वतंत्र अधिवास शोधायला सुरुवात केली आहे, जे व्याघ्र संवर्धनातील एक मोठे यश मानले जात आहे.
टिपेश्वरच्या भविष्यासाठी सुचिन्ह
या यशस्वी घटनेमुळे टिपेश्वर अभयारण्याची ओळख आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. वाघांची वाढती संख्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी पोषक असलेले वातावरण यामुळे भविष्यात येथे वन पर्यटनाला मोठा वाव मिळण्याची शक्यता आहे. सहा बछड्यांचे यशस्वी संगोपन हे केवळ 'टी-३' वाघिणीचेच नव्हे, तर संपूर्ण वनविभागाच्या अथक प्रयत्नांचे आणि निसर्गाच्या अद्भुत किमयेचे प्रतीक ठरले आहे.