यवतमाळ : उमरखेड येथील एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तोंडावर मिरची पावडर टाकून लुटल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दिवसभर झालेली वसुली दोन लाख तीस हजार रुपये दोघांनी लुटल्याची घटना गुरुवारी (दि.26) दुपारच्या सुमारास घडली.भारत फायनान्स कंपनी उमरखेड कार्यालयात कार्यरत असलेले स्वप्निल राजू बाजगिरे हे आपल्या दुचाकीने उमरखेड शहरातील विविध भागात बचत गटाकडून वसुलीचे कार्य करत होते.
दुपारी दोनच्या दरम्यान बंडू कोडगीरवार यांचे घराचे व शेताचे जवळ येताच त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी तोंडावर मिरची पावडर टाकून त्यांच्या जवळील रोख रक्कम दोन लाख २९ हजार २३८ रुपये लंपास केले. दोघेही तोंडावर रुमाल बांधून असल्याचे त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.