

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : पुसद तालुक्यातील वसंतनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथे प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र, पोलिसांना माहिती न देता परस्पर शनिवारी रात्रीच या प्रेमीयुगलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घातपाताची असल्याची हे रहस्य मात्र कायमच आहे.
आस्तिक गणेश राठोड (वय २५), पल्लवी भीमराव पवार (वय २०), अशी मृतांची नावे आहेत. अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपवभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी रविवारी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांनी वसंतनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेवून तपास सुरू केला आहे. आस्तिक व पल्लवी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांच्या कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध असल्यामुळे आस्तिक याच्या घरी प्रेमीयुगलाने जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नातेवाइकांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता शनिवारी रात्रीच दोघांवर अंत्यसंस्कार केले. पोलिस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच रविवारी ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले; परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहे. दोन दिवसांत या प्रकरणाची खरी माहिती समोर येईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.