

यवतमाळ : झोपेत असलेल्या पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी पुसद येथील टीपू सुलतान चौक, वसंतनगर येथे उघडकीस आली. सानिया परवीन मो. आसिफ कुरेशी (वय २१) असे मृत महिलेचे नाव असून, वसंतनगर पोलिसांनी आरोपी पती मो. आसिफ मो. शफी कुरेशी (वय ३०, रा.टीपू सुलतान चौक, वसंतनगर) याला अटक केली आहे.
वसंतनगर येथील मो. आसिफ कुरेशी व सानिया परवीन यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. सोमवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्याचा प्रचंड राग मनात धरून आसिफने सानिया झोपेत असताना धारदार चाकूने तिचा गळा चिरून खून केला. त्यांच्या झटापटीचा आवाज आल्याने घरातील इतर सदस्यांनी दरवाजा ठोठावला, तर आतून कडी लावलेली होती. दरवाजा तोडला असता, सानिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच सानियाचा मृत्यू झाला.