Leopard found dead in Yavatmal | कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला

Leopard found dead in Yavatmal | कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला
Published on
Updated on

यवतमाळ : बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याचे दात व नखे शरीरापासून वेगळी करून एका प्लास्टिक पिशवीत जवळच फेकून दिल्याची धक्कादायक बाब आर्णी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावळी वनपरिक्षेत्रातील वरुड (तुका) शेतशिवारात शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नैसर्गिक मृत्यू की अवयव तस्करीचा प्रयत्न असा संशय व्यक्त केला जात आहे.

सावळी सदोबा वनपरिक्षेत्रातील वरूड शेतशिवारात मागील काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. शनिवारी एका शेतात बिबट्याचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह काही नागरिकांना दिसून आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक वनसंरक्षक तौर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

बिबट्याचा मृत्यू अंदाजे १५ दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्याचे दात आणि नखे शरीरावर नव्हती. तपासादरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावरच एका प्लास्टिक पिशवीत हे अवयव भरून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले. शिकार्‍याने बिबट्याला ठार केले असावे आणि अवयव काढून नेताना काही अडचण आल्याने किंवा पकडले जाण्याच्या भीतीने ते तिथेच टाकून पळ काढला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. मृत बिबट्याचे अवशेष उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. या अहवालानंतरच बिबट्याचा मृत्यू विषबाधेने झाला की अन्य कारणाने, हे स्पष्ट होणार आहे. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन मेहर, वन-परिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने, घोडमारे व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी दादासाहेब तौर करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news