यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने बसस्थानकाची नवीन सुसज्ज ईमारत बांधण्यात आली आहे.१३ कोटी ८३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या ईमारतीचे लोकार्पण सोमवारी (दि.14) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे झाले. लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड हे मंत्रालयातून दुरदृष्य प्रणालीद्वारे तर आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, एसटी महामंडळाचे नागपूर व अमरावती विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने, महामंडळाच्या अमरावती विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोडक, विभाग नियंत्रक अमृत कच्छवे, विभागीय अभियंता विद्युत विणा गायकवाड, विभागीय अभियंता स्थापत्य नितीन गावंडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी सतीश पलेरीया आदी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयातून दुरदृष्य प्रणालीद्वारे ईमारतीचे लोकार्पण केल्यानंतर प्रत्यक्षपणे कार्यक्रमस्थळी आ.मदन येरावार व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी फित कापून बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल केले. प्रातिनिधीक स्वरूपात नवीन बसस्थानकातून एक बस रवाना करण्यात आली.यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.येरावार म्हणाले, एसटी बसचे सामान्य जनतेशी फार मोठे नाते आहे. जिल्ह्यात १ हजार ३०९ गावांमध्ये एसटी जाते. ४०० बस प्रवाशांच्या सेवेत आहे. सामान्य मानसाला प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एसटीचे कर्मचारी प्रतिकुल, विपरीत परिस्थितीत देखील काम करत असतात. यवतमाळचे बसस्थानक आधुनिक व्हावे, असा आमचा आग्रह होता. नवीन सुसज्ज ईमारत लोकसेवेत दाखल होतांना आनंद होत असल्याचे येरावार म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी वाहतूक व्यवस्थेत एसटी महामंडळाची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचे सांगितले. पालकमंत्री संजय राठोड व आ.मदन येरावार यांनी यासाठी चांगला पाठपुरावा केल्याने त्यांनी आभार मानले. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने यांचे देखील यावेळी मनोगत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अभियंता नितीन गावंडे यांनी केले. नव्याने लोकार्पण झालेल्या या ईमारतीत १७ प्रतिक्षालय फलाट, वाहतुक नियंत्रण, निरिक्षण व तिकीट आरक्षण कक्ष, पुरुष व महिला चालक, वाहकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह, पोलिस चौकी, पार्सल, उपहारगृह, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, १० दुकान गाळे, दुचारी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ आदी सुविधा आहेत.