

यवतमाळ : चारित्र्याच्या संशयाने पछाडलेल्या पतीनेच आपल्या पत्नीची डोक्यात सिलिंडर घालून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना शहरातील वाघापूर परिसरात घडली आहे. बुधवारी (दि. ९) रात्री जय महाराष्ट्र नगरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
इंद्रकला विजय जयस्वाल (वय ५२) असे मृत महिलेचे नाव असून, पती विजय शंकरलाल जयस्वाल (वय ६०) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय जयस्वाल हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नी इंद्रकला यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. बुधवारी (दि.९) रात्री मुलगा अक्षय घराबाहेर असताना, पती-पत्नीत पुन्हा वाद उफाळून आला. या वादाने इतके रौद्ररूप धारण केले की, संतापाच्या भरात विजयने घरातील गॅस सिलिंडर उचलून थेट इंद्रकला यांच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही वेळाने मुलगा अक्षय घरी परतला असता, त्याला घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई आणि तिच्याजवळच शांतपणे बसलेला बाप दिसला. हे हृदयद्रावक दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. त्याने तात्काळ लोहारा पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. मुलगा अक्षय जयस्वाल याच्या तक्रारीवरून पोलिसांनी वडील विजय जयस्वाल विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.