.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. रात्रीपासून पावसाचा वेग वाढला. जो सोमवारीसुद्धा कायम आहे. या पावसाने अनेक रेकॉर्ड मोडले असून जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. (Yavatmal Rain)
यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये २४ तासांमध्ये ८३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक १२९ मिमी पावसाची नोंद वणी तालुक्यात करण्यात आली. अतिवृष्टीमुळे बेंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. बाभूळगाव, कळंब, महागाव आणि उमरखेड तालुक्यात १०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने विदर्भ मराठवाड्याची वाहतूक ठप्प झाली. महागाव तालुक्यातील भांब गावात पुराचे पाणी शिरले. या ठिकाणी अनेक घरांतील अन्नधान्य वाहून गेले. नेर तालुक्यातील पिंप्री मुखत्यारपूर येथे ढगफुटीसदृश पावसाची नोंद करण्यात आली. या ठिकाणी शेत-शिवारातील पीक खरडून गेले. (Yavatmal Rain)
रविवारी सकाळी ११ वाजता बैलगाडी घेऊन शेतात निघालेल्या पुरुषोत्तम आसाराम मेश्राम (वय ६०) या शेतकऱ्याची बैलगाडी शेताच्या रस्त्यावर असलेल्या नाल्यात वाहून गेली. बैलगाडी काही अंतरावर जाऊन झाडात अडकली. यात एका बैलाचा मृत्यू झाला. दिवसभर शोध घेतल्यानंतर रविवारी सायंकाळी शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. ही घटना दारव्हा तालुक्यातील देऊरवाडी लाड येथे घडली.
जिल्ह्यातील ११० मंडळांपैकी ५३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या ठिकाणी ६५ ते १२९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुराचे पाणी घरात शिरल्याने केळापूर आणि पुसद तालुक्यातील ६२ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत १४४ घरांची पडझड नोंदविण्यात आली. यामध्ये आर्णी तालुक्यातील ६, बाभूळगाव ३०, केळापूर २२, झरी २, घाटंजी ४६, राळेगाव ३३, मारेगाव ३ आणि वणी तालुक्यात ४ घरांची पडझड झाल्याची नोंद झाली आहे. आपदग्रस्त भागात मदत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
महागाव तालुक्यातील पावसाने या तालुक्यातील अनेक मार्ग बंद पडले, आमणी रस्ता बंद झाला. शिरपूर रस्त्यावरून पाणी वाहत होते. पुसद गुंज मार्ग काही काळ बंद होता, पैनगंगा नदीला मोठा पूर आला. यावेळी आलेल्या पुराने विदर्भ मराठवाड्यातील वाहतूक थांबली. भांब, मोहदी गावात पुराचे पाणी शिरले. पुसद माहूर रस्त्यावरील शिरपूर पुलावरून पाणी वाहिले. यामुळे माहूर मार्ग बंद होता. राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी गावात पाणी शिरल्याने गावात रात्रीच्या वेळी दहशतीची स्थिती निर्माण झाली होती.
बाभूळगाव, घाटंजी, राळेगाव आणि झरी तालुक्यातील ५२ गावांना याचा मोठा फटका बसला. या ठिकाणी नदी- नाल्यांना आलेल्या पुराने चार हजार २८७ हेक्टरचे नुकसान झाले. यात बाभूळगाव तालुका ८०० हेक्टर, घाटंजी दोन हजार ८८४, राळेगाव ५९०, तर झरीमध्ये १३ हेक्टर क्षेत्रावर नुकसानीची नोंद करण्यात आली. कोनदारी गावात पुराचे पाणी शिरले. या ठिकाणी असलेल्या हळदीच्या पिकाला याचा फटका बसला.
वणी १२९ मिमी, कळंब ११४ मिमी, बाभूळगाव १०६ मिमी, दिग्रस ९७ मिमी, उमरखेड ९६ मिमी, महागाव ९३ मिमी, केळापूर ९१ मिमी, झरी ७८ मिमी, घाटंजी ७८ मिमी, पुसद ७४ मिमी, राळेगाव ७३ मिमी, आर्णी ६९ मिमी, यवतमाळ ६८ मिमी, मारेगाव ६७ मिमी, दारव्हा ५४ मिमी, नेर ५२ मिमी.