

Yavatmal Farmer Issues
यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेत तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या दरम्यान दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे घडली. विहिरीत उडी मारताना त्याने ३५ किलो वजनाचे मोठे दगड पायाला दोरीच्या सहाय्याने बांधले होते. त्यामुळे त्याला वाचविता आले नाही.
अमोल जगदीश काळे (वय २८), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी अमोल हा कांदळी मार्गावरील एका शेताच्या विहिरीजवळ घुटमळत होता. परिसरात कुणी नसल्याचे बघून त्याने पायाला वजनदार दगड दोरीच्या साह्याने बांधून विहिरीत उडी घेतली. ही बाब लक्षात येताच मजुरांनी विहिरीकडे धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पायाला दगड बांधून असल्याने त्याला वाचविता आले नाही.
उपसरपंच जयवंत अंचेटवर व पोलिस पाटील यांनी आर्णी पोलिसांना माहिती दिली. त्याच्याकडे चार एकर शेती असून, अमोल सर्व व्यवहार बघत होता. १२ वर्षांपूर्वी अमोलच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. शेतीवर जिल्हा मध्यवर्ती, बँक ऑफ बडोदा व खासगी कर्ज आहे. शेतीचे झालेले नुकसान व कर्जफेडीच्या चिंतेने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. मृत शेतकऱ्याच्या पश्चात आई, भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे.