

यवतमाळ : महावितरणच्या विद्युत खांबाच्या तंगाव्याला आलेल्या वीज प्रवाहाचा जबर धक्का लागून एका ४ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बाभूळगाव तालुक्यातील गवंडी येथे सोमवारी (दि.३०) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. तनश्री संजय कोरटकार (वय ४) असे या मृत चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन वर्षांपासून तनश्रीचे आई-वडिल शेळ्या- मेंढ्या चारायला बाहेरगावी जातात. त्यामुळे तनश्री ही ताराचंद साहेबराव कोरटकार या आपल्या काकाजवळ राहत होती. दरम्यान सोमवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान गावातील रंगराव बाळकृष्ण कोरटकार यांच्या घरासमोरील महावितरणच्या सिमेंट पोलच्या तंगाव्याला स्पर्श झाल्याने त्याला ती चिकटली. पावसामुळे जमिनीत ओलावा आला असल्याने सिमेंट पोलच्या तंगाव्यात वीज प्रवाह आला होता. तनश्रीचा त्या तंगाव्याला चिटकून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर घटनेची माहिती महावितरण व पोलिसांना देण्यात आली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा बंद केला. पोलिसांनी पंचनामा करुन मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.