

Yavatmal News
यवतमाळ : ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थींना शिकाऊ व कायमस्वरूपी परवाना देण्यासाठी दलालामार्फत दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दलालासह एकाचवेळी तीन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकास रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुसद येथे आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली.
सुरज गोपाल बाहीते, (वय ३२), मयुर सुधाकर मेहकरे (वय ३०), बिभिषण शिवाजी जाधव (वय ३०) अशी अटक केलेल्या यवतमाळ उप प्रादेशिक कार्यालयात कार्यरत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांची नावे तर बलदेव नारायण राठोड (वय २९) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे.
पुसद येथे तक्रारदार महिलेचे सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल आहे. प्रशिक्षणार्थींसाठी उप प्रादेशिक कार्यालयामार्फत शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरादरम्यान शासकीय चलनाव्यतिरिक्त २ हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकाराची तक्रार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची दखल घेत ७ ते १५ मे या कालावधीत पडताळणी करण्यात आली. यादरम्यान तक्रारदार महिलेच्या १० प्रशिक्षणार्थींना शिकाऊ व कायमस्वरूपी परवाना देण्यासाठी प्रत्येकी २०० प्रमाणे २ हजार रुपये लाचेची मागणी केली.
१६ मे रोजी रक्कम स्वीकारण्याचे ठरले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यात तक्रारदार महिलेकडून दलालामार्फत २ हजाराची लाच घेताना तीन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासह दलालास रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी पुसद येथील वसंत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके आणि पोलीस अंमलदार अतुल मते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचीन भोयर, राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम, सरिता राठोड व चालक अतुल नागमोते यांनी केली.