यवतमाळ : नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगव्हाण घाटाच्या पायथ्याशी शनिवारी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील असणाऱ्या आजोबाचा आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. रमनिकभाई भीमजीभाई पटेल (वय ६५) आणि केतव राजेश पटेल (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. तर महेंद्र नत्थूजी बागडे (वय ५६) असे ट्रक चालकाचे नाव आहे. तो सावनेर जि. नागपूर येथील रहिवाशी आहे. रमनिकभाई पटेल हे नातू केतव राजेश पटेल याला सोबत घेऊन महागाव कडे येत होते. पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
यावेळी ट्रक अंगावरून गेल्याने रमनिकभाई आणि केतवचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. यानंतर नशेत असलेल्या ट्रक चालकाने घटनेनंतर आपले वाहन यवतमाळच्या दिशेने पळविले. प्रत्यक्षदर्शिनी या भीषण अपघाताची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी लगेच महागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे आणि पोलीसांचा ताफा सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. अवघ्या काही वेळात फरार होऊ पाहणाऱ्या ट्रक चालकाच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले. उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.