यवतमाळ : आर्णी तालुक्यातील कोपरा येथील २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने शारिरिक व मानसिक छळ झाल्याने विष प्राशन करून जीवन संपविले. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी युवकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अनुराधा भीमराव ढोके (वय २१) असे त्या तरुणीचे नाव आहे.
अनुराधा ही आर्णी येथे शिक्षण घेत होती. तिचे व संशयित आरोपी भूषण भुजाडे (वय २६) यांचे प्रेमसंबंध मागील वर्षभरापासून होते. काही कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होता. ९ सप्टेंबर रोजी अनुराधा गावातील एका घरात महालक्ष्मीच्या आरतीला जात असताना भूषणने तिला अडवून वाद घातला. यावेळी ग्रामस्थांनी यात मध्यस्थी करून त्याचा वाद सोडवला. त्यानंतर भूषण हा अनुराधाला शिवीगाळ करीत होता. दरम्यान तिला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती. याच भीतीतून अनुराधाने विष प्राशन केले. आणि ती घरात कोसळली.
घराशेजारी राहणाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच तिला तात्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिचा भाऊ गणेश भीमराव ढोके यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी भूषण भुजाडे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आर्णी पोलिस करीत आहे.