यवतमाळ : संस्थेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात; नव्या नियमामुळे गोंधळ | पुढारी

यवतमाळ : संस्थेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात; नव्या नियमामुळे गोंधळ

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि संस्थेची ट्यूशन फी विद्यार्थ्यांच्या खात्यात वळती झाली आहे. ही ट्यूशन फी संस्थेची असल्याने संस्थेत जमा करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक विद्यार्थी ही फी देण्यास नकार देत आहे. यामुळे संस्थेचा विकास आणि संपूर्ण कामकाज कोलमडले आहे. याप्रकरणात संस्थेला वसुलीसाठी सुरक्षा प्रदान करावी असे निवेदन यवतमाळ जिल्हा नर्सिंग संस्थाचालक संघटनेने जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधीक्षकांना सादर केले आहे.
या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली ट्यूशन फी सात दिवसात संस्थेत जमा करावी अथवा परस्पर खात्यात ट्रान्सफर करणे अपेक्षित होते. मात्र अर्ध्या अधिक विद्यार्थ्यांनी ही रक्कमच महाविद्यालयात जमा केली नाही. यामुळे संस्था चालकांचे शिक्षण शुल्क मिळालेले नाही. त्यामुळे याबाबतच्या नियमात बदल करण्याची गरज संस्था चालकांनी व्यक्त केली. पैसे वळते झाल्यानंतर विद्यार्थी, पालक पैसे देण्यास नकार देत आहेत. अनेकजण हे पैसे खात्यात आलेच नाही असे सांगत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले नाही अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात पत्र काढून कारवाई करावी. विद्यार्थ्यांनी ट्यूशन फी चे पैसे न देणे हा अपहार असल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गाडे पाटील, उपाध्यक्ष सदाशिव महाजन, सचिव अभय घुईखेडकर, प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते

Back to top button