यवतमाळ
यवतमाळ : उसनवारीच्या पैशातून महिलेचा खून
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : फेरीवर कुरकुरे, पापड, ब नरडे विक्री करणाऱ्या युवकाने हातउसनी रक्कम घेतली. यावरूनच वाद घालत माय लेकांनी थेट चाकूने भोसकून महिलेचा खून केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी शहरातील तारपुरा, आठवडीबाजार भागात घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली व तिचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला.
सदाफ शेख अकील शेख (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती शेख अकील शेख जमाल हा कुरकुरे विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने घराजवळ राहणाऱ्या बेबी आनंद जोशी (वय ५०) या महिलेकडून ३० हजार रुपये हात उसने घेतले होते. यापैकी बरीच रक्कम परत केली. त्यानंतरही बेबी व तिचा मुलगा विशाला आनंद जोशी हे पैसे मागण्यासाठी तगादा लावत होते.
शुक्रवारी सायंकाळी शेख अकिल हा फेरीवरून परत आला असता, त्याला त्याची आई जैतुनबी हिच्यासोबत घडलेला प्रकार माहीत पडला. बेबी व तिचा मुलगा विशाल याने वाद घालून अकिलची आई जैतुनबी हिच्या तोंडावर झापड मारून शिवीगाळ केली. हे ऐकल्यावर अकील संतापल. तो याचा जाब विचारण्यासाठी बेबी जोशी हिच्या घराकडे गेले असता, त्याच्या मागे सदाफ शेख आणि वहिनी यासमिन आणि रुकसार तेथे पोहोचल्या. यावेळी विशाल जोशी याने थेट चाकूने हल्ला चढविला. यात सदाफ शेख हिच्या पोटावर चाकूने वार केल्यामुळे तिचे आतडे बाहेर आले. तर बेबी जोशी हिने काठीने शेख अकिल याला मारहाण केली. त्यांच्या तावडीतून जखमी पत्नीची सुटका करून तिला दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शेख सदाफ हिच्या पोटावर चाकूचा घाव जिव्हारी लागला. त्यामुळे आतडे बाहेर आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र शनिवारी सायंकाळी शेख सदाफ हिची मृत्यूसोबत असलेली झुंज संपली. शेख अकिल याच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी जोशी मायलेकाविरुद्ध खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

