

यवतमाळ : पाणी आणण्यासाठी नदी पात्रात गेलेल्या १२ वर्षीय बालिकेचा पाय घसरून करूण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील काठोडा नजीक असलेल्या पारधी बेडा येथे आज रविवारी सकाळी १० वाजता घडली.
वेदिका नरेश चव्हाण असे मृत बालिकेचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील काठोडा नजीक असलेल्या पारधी बेडा हे २०० लोकांची आदिवासी वस्ती आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही येथे वीज, पाणी यांसारख्या नागरी सुविधा विकसित केलेल्या नाहीत. त्यामुळे आज एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला. पारधी बेडा येथील वेदिका ही बालिका आई-वडील बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने आपल्या आजीसह पारधी बेडा येथे राहत होती.
वस्तीत पाण्याची सुविधा नसल्याने नेहमीप्रमाणे वस्तीतील महिला पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी वस्तीलगतच्या अरुणावती नदीपात्रात जातात. आज वेदिकाही त्यांच्यासोबत गेली होती. परंतु, वेदिकाचा पाय घसरल्यामुळे ती नदीपात्रात पडली व त्यातच तिचा बुडून मृत्यू झाला. ही बातमी वस्तीवर पसरताच लोकांनी नदीपात्रात एकच गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बीट जमादार मुकुंद केंद्रे, देवानंद मुनेश्वर, महेश गावंडे, अतुल पवार व अरविंद चिमटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठवला.