

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना पुसद शहरातील बोरनगर तांडा येथे मंगळवारी (दि.१०) घडली. मनुका कैलास राठोड (वय ४४) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती कैलास मेरसिंग राठोड (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बोरनगर तांडा येथे राहणारे मनुका व कैलास राठोड हे पती-पत्नी पुणे येथे कामासाठी गेले होते. दोघेही सोमवारी रात्री गावी बोरनगर तांडा येथे परत आले. या दोघांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमी वाद होत होता. सोमवारी रात्री नेहमीसारखे दोघांत भांडण जुंपले. यातून वाद वाढतच गेला आणि संतापलेल्या पती कैलासने रागाच्या भरात पत्नीला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत पत्नी मनुका भिंतीवर आदळून खाली पडली. त्याचवेळी पतीने साडीच्या पदराने गळा आवळून तिला ठार मारले. या प्रकरणाची तक्रार मनुकाचा भाऊ दिलीप मधुकर चव्हाण (वय ५२ रा. तरोडा, ता. उमरखेड) यांनी पुसद शहर पोलिसांत दिली. याप्रकरणी कैलासला गावातूनच अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस प्रेमकुमार केदार करीत आहे.
हेही वाचलंत का ?