

अजय ढवळे
वाशिम: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका पात्राने आणि त्यातील अत्यंत आक्रमक भूमिकेने महाभूकंप घडवून आणला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर भाजपचे वजनदार नेते राजू पाटील राजे यांनी थेट पोलीस तक्रार दाखल केल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
जबाबदार नेत्याचा 'बिनडोक'पणा?; भाजप कार्यकर्त्यांचा टोला
या प्रकरणाचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या अभ्यासू आणि महत्त्वाच्या नेत्याने केवळ वैयक्तिक आकस असलेल्या व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बिनबुडाचे आरोप केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाशिममधील भाजप कार्यकर्त्यांकडून आता अशी खोचक प्रतिक्रिया उमटत आहे की, "एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या नेत्याने विना पुराव्यानिशी, केवळ दुसऱ्याने कान भरले म्हणून प्रसारमाध्यमांसमोर बडबडणे, हा त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा लक्षण आहे. वडेट्टीवारांना आता खरोखरच वैद्यकीय उपचारांची गरज आहे."
काय आहे 'बनावट नोटांचा' आरोप?
राजू पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, २८ आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी विजय वडेट्टीवार यांनी जाणीवपूर्वक माध्यमांसमोर असा खोटा दावा केला की राजू पाटील हे 'बनावट नोटांचा व्यवसाय' करतात आणि त्यांच्यावर तसा एफआयआर (FIR) दाखल आहे. राजू पाटील यांनी हा दावा धादांत खोटा असल्याचे म्हटले असून, वडेट्टीवारांनी कोणतीही शहानिशा न करता आपली समाजात मानहानी केल्याचे पोलीस तक्रारीत स्पष्ट केले आहे.
कुटुंबावर घाणेरडी टीका; वडेट्टीवारही जाळ्यात?
तक्रारीनुसार, गैरअर्जदार क्रमांक २ हरीष सारडा गेल्या ३-४ वर्षांपासून राजू पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी, मृत आई आणि कुटुंबावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी करत आहे. याच सारडाने दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
'पुरावे द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा'
"मी भाजपचा माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष असून माझ्या नेतृत्वात दोन विधानसभा आमदार निवडून आले आहेत". "नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये माझ्या नेतृत्वाखाली भाजपचे अनेक उमेदवार विजयी झाले, हे यश न पचल्यानेच माझी बदनामी सुरू आहे". "विजय वडेट्टीवारांनी पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याबद्दल कठोर कारवाई व्हावी".
राजू पाटील पुढे काय होणार?
वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल झाली असून, एका माजी विरोधी पक्षनेत्यावर अशा प्रकारे 'मानहानी' आणि 'खोट्या बातम्या पसरवल्या' प्रकरणी गुन्हा दाखल होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.