

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: पुसद मार्गावर अनिकेतचा मृतदेह सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. 14 वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडे याचे 60 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. 12 मार्चला हे अपहरणाचे प्रकरण घडले होते. त्यानंतर पोलिसांनी अनिकेतच्या शोधासाठी तपासाची चक्रे गतिमान करत शोध सुरू केला. मात्र, तरीही अनिकेतचा थांगपत्ता न लागल्याने पालकांना मोठी चिंता लागली होती. तर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तब्बल चार जिल्ह्यातील 12 पोलिस पथकं शोधकार्यात लावली होती. अखेर दि. 21 मार्च रोजी 10 व्या दिवशी अनिकेतचा मृतदेह सापडल्याने साधुडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या नाट्यमय अपहरणातून अनिकेतचा खून झाल्याचे उघड झाले आहे. (Washim Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 13 मार्चरोजी पोलीस स्टेशन अनसिंग हददीतील ग्राम बाभुळगाव येथील संतोष सादुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तक्रार दिली की त्यांचा मुलगा अनिकेत संतोष सादुडे (वय 14, रा. बाभुळगाव) हा गावातील लग्नाचे मिरवणुकीत नाचायला गेला होता. रात्रीचे दोन वाजल्यानंतरही तो घरी न परतल्याने वडील संतोष सादुडे यांनी त्याचा गावात शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. त्याचवेळी संतोष सादुडे यांना त्यांच्या घराजवळ एक पाच पानांचे पत्र मिळून आले. त्यामध्ये अनिकेतचे अपहरण केले असून 60 लाखांची खंडणीची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्यास अनिकेतला जीवे मारण्याबाबत धमकी दिली होती.
संतोष सादुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तकार दिल्यानंतर गुन्हा नोंद करून तात्काळ तपासाची चक्रे फिरवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी 18 अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथके तयार केली. सर्व दिशांनी तपास सुरू करण्यात आला. सर्वत्र अनिकेतचा शोध घेण्यात आला. सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांनी तांत्रिक बाबींवर अहोरात्र तपास केला.
तपासदरम्यान प्रणय पदमणे, शुभम इंगळे यांच्यावर पहिल्या दिवसापासुनच संशय असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन सखोल तपास करण्यात आला. त्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार केलेल्या चौकशी वरून त्यांच्या जबाब, हालचाली, कृती मध्ये प्रत्येक वेळेस येत असलेल्या विसंगतीमुळे त्यासर्व जबाबांचा निष्कर्ष काढून अंत्यत बारकाईने व तांत्रिक विश्लेषण करुन चौथ्यांदा विचारपूस केली असता प्रणय पदमणे याने गुन्हयाची कबुली दिली.
दि. 12 मार्चरोजी रात्री 12 वाजता अनिकेत संतोष सादुडे (वय 14) याला शुभम इंगळे याचे मदतीने मिरवणुकीमधुन आमिष दाखवून बाभुळगाव ते बाभुळगांव फाटा शेतशिवारात नेले. त्याचा 13 मार्चरोजी गळा दाबून खून केला. आरोपीने सदर कृत्य जुन्या वादातून व विकृत मनोवृत्तीतून केले. पण आपले कृत्य उघड होऊ नये, म्हणून पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटावी. सर्वत्र संभ्रम निर्माण व्हावा, यासाठी किडनॅपिंग व खंडणी मागणीचा चिठ्ठी टाकून बनाव तयार केला. तपासादरम्यान पुसद रोडवरून अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
सखोल तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे. अशा प्रकारची घटना वाशिम जिल्हयातील पहिलीच घटना असल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते.
या गुन्हयाचा तपास अनुज तारे (जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम), लता फड (अपर पोलीस अधीक्षक, वाशिम), नवदीप अग्रवाल (सहा.पो.अधीक्षक), निलीमा आरज, (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपिर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, प्रदिप परदेसी, अमर चोरे, प्रविण धुमाळ, राजेश खेरडे, यांनी केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर चोरे करीत आहेत.