

Attempt to murder Washim
वाशिम : शहरातील जुन्या वादातून एका २६ वर्षीय युवकावर पिस्तूल रोखून खंजर व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १४) पहाटे घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला असून भरवस्तीत घडलेल्या या सशस्त्र प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वैभव तुकाराम बोरकर (रा. शुक्रवार पेठ) आणि आरोपी राहुल ठाकरे, सचिन कोठेकर, वैभव गुंजकर, कृष्णा मार्गे व गौरव गवळी यांच्यात सुमारे महिनाभरापूर्वी वाहन उभे करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद मनात धरून १३ मार्च रोजी रात्री सुमारे ११ वाजता परळकर चौक परिसरातून लग्नाची वरात जात असताना आरोपींनी वैभव बोरकर याला अडवून मारहाण केली. त्यावेळी “आज तुला संपवून टाकतो, तू इथेच थांब,” अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले होते.
या घटनेनंतर काही तासांतच १४ मार्च रोजी पहाटे सुमारे २ वाजता वैभव बोरकर घरासमोर उभा असताना पाचही आरोपी दोन दुचाकींवरून शस्त्रांसह तेथे पोहोचले. आरोपी वैभव गुंजकर याने कंबरेला लावलेली पिस्तूल काढून बोरकर यांच्यावर रोखली. त्याचवेळी गौरव गवळी याने धारदार खंजरने डाव्या बरगडीवर वार केला, तर सचिन कोठेकर याने लोखंडी पाईपने मांडीवर जोरदार प्रहार केला. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यावेळी वैभव बोरकर यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घाईगडबडीत आरोपींनी एक दुचाकी, पिस्तूल व लोखंडी पाईप घटनास्थळीच सोडून दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी वैभव बोरकर यांच्या तक्रारीवरून राहुल ठाकरे, सचिन कोठेकर, वैभव गुंजकर, कृष्णा मार्गे व गौरव गवळी (सर्व रा. बाळसमुद्र, वाशिम) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच आर्म्स ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.