

वाशिम : शहरातील खामगाव जिन परिसरात विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला वाशिम शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या चार पेट्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी, असा एकूण १ लाख ३४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामगाव जिन परिसरात संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत कैलास राऊत (वय २१, रा. कुंभार गल्ली, वाशिम) हा सुझुकी ॲक्सेस दुचाकीवरून विनापरवाना देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता, त्यामध्ये १४ हजार ५६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या चार पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी दारूच्या पेट्यांसह अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. या कारवाईत एकूण १ लाख ३४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस अंमलदार हरिभाऊ काळापाड, अरविंद राठोड, स्वप्निल शेळके आणि समाधान शृंगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.