Washim Gutka Raid : सव्वा कोटींच्या गुटख्यासह अमरावतीच्या 'जावेद भाई'चे रॅकेट उद्ध्वस्त

समृद्धी महामार्गावर पोलिसांची धडक कारवाई
Washim Gutka Raid
Washim Gutka Raid
Published on
Updated on

वाशिम : कारंजा लाड तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावरून सुसाट वेगाने होणाऱ्या गुटखा तस्करीच्या साम्राज्यावर महामार्ग पोलिसांनी धाडसी कारवाई करत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.९) रात्री कारंजा लाड टोल नाक्यावर करण्यात आली. यामुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अमरावतीच्या 'जावेद' नावाच्या कुख्यात माफियाचा पर्दाफाश झाला आहे.

९ मे च्या रात्री महामार्ग पोलिसांचे पथक टोल नाक्यावर पाळत ठेवून होते. पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या सूचनेवरून सापळा रचण्यात आला होता. संशयित आयशर ट्रक (MH 40 CT 2964) थांबवताच चालकाने सुरुवातीला हुज्जत घातली. मात्र, ट्रकच्या फटीतून येणाऱ्या उग्र सुंगधी वासामुळे पोलिसांचा संशय बळावला. ताडपत्री हटवताच आत गुटख्याच्या गोण्यांचे डोंगर पाहून पोलीसही अवाक झाले. तपासात चालकाने कबुली दिली की, हा सर्व माल अमरावतीच्या 'जावेद भाई'चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुटखा किंग जावेद हा गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि अकोला या पाच जिल्ह्यांत गुटख्याचे जाळे पसरवून बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक पोलिसांना हाताशी धरून, त्यांना 'मॅनेज' करून हा माफिया आपले हातपाय पसरत होता, मात्र महामार्ग पोलिसांच्या इमानदारीने आज त्याचे कंबरडे मोडले आहे.

'सिनेमॅटिक थरार' : सुंगधी उग्र वासाने उघडले तस्करीचे गुपित

रात्रीच्या अंधारात महामार्ग पोलिसांचे पथक वाघासारखे टपून बसले होते. पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या 'इनपुट'नुसार सापळा रचला होता. आयशर ट्रक (MH 40 CT 2964) थांबवल्यानंतर चालकाने सुरुवातीला हुज्जत घातली, पण जेव्हा पोलिसांनी आपला खाकीचा हिसका दाखवला, तेव्हा त्याचे अवसान गळाले. ट्रकच्या छतापर्यंत खच्चून भरलेल्या गुटख्याच्या गोण्या बघून डोळे विस्फारले होते. गुटखा माफिया जावेदने पाच जिल्ह्यांत आपले 'नेटवर्क' इतके घट्ट विणले होते की, कोणालाही संशय येऊ नये. मात्र, हायवे पोलिसांनी त्याचे हे 'इम्पायर' एका रात्रीत धुळीस मिळवले. महामार्ग पोलिसांना जमले, ते स्थानिक पोलिसांना का जमले नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

या कारवाईनंतर आता पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जो जावेद गेली अनेक वर्षे राजरोसपणे गुटखा विकून करोडोंची माया जमवत आहे, तो स्थानिक पोलिसांना का दिसला नाही? स्थानिक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हे ट्रक पास कसे व्हायचे? महामार्ग पोलीस जर जिवावर उदार होऊन १.३१ कोटींचा माल पकडू शकतात, तर स्थानिक पोलीस या माफियावर मेहेरबान का होते? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. जावेदच्या या गुटखा रॅकेटमध्ये नेमके कोणते पांढरपेशी 'वर्दी'वाले सामील आहेत, याचा शोध घेणे आता काळाची गरज बनली आहे.

ही कारवाई महामार्ग पोलिस वाशिम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार दांदडे , पीएसआय कृष्णकन्हैया पवार , जमादार अमोल इंगोले , जमादार आनंद काकडे आणि त्यांच्या टीमने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news