

Washim Police Liquor Seizure
वाशीम : वाशीम जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. अवघ्या पाच दिवसांत जिल्हाभरात ७८ ठिकाणी छापे टाकून सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार २९ मे ते ३ जून २०२६ या कालावधीत जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू, देशी-विदेशी मद्यसाठा, दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा गुळ, नवसागर, रसायने, हातभट्टी साहित्य आणि अन्य उपकरणे जप्त केली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईदरम्यान अनेक संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, बेकायदेशीर दारू विक्री व निर्मितीला पूर्णतः आळा घालण्यासाठी पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना, जिल्ह्यात कुठेही अवैध गावठी दारूची निर्मिती किंवा विक्री होत असल्याची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष अथवा संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी, असे सांगितले. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
ही विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी (वाशीम, मंगरुळपीर व कारंजा), स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
अवैध दारूविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून, कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.