

वाशिम: स्थानिक सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरुद्ध अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे टोकाचे पाऊल उचलले आहे. कॉलेज प्रशासनाकडून होणारा मानसिक, आर्थिक व भावनिक छळ थांबत नसल्याने आणि वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने उद्विग्न झालेल्या विद्यार्थ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आमरण उपोषण' सुरू केले आहे. ७ दिवसांची मुदत देऊनही न्याय न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले असून, यामुळे वाशिम परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समाज कल्याण कार्यालय (वाशिम) आणि एसटी कार्यालय (अकोला) चे अधिकारी कॉलेजमध्ये गेले होते. मात्र, त्यावेळी कॉलेजचे कर्मचारी जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. तसेच शिष्यवृत्तीशी संबंधित नोंद वही, बँक पासबुक स्टेटमेंट व इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासणी अधिकाऱ्यांना दाखवण्यास आणि हस्तगत करण्यास साफ नकार देण्यात आला.
मुदत संपूनही कारवाई शून्य: विद्यार्थ्यांनी यापूर्वी दिनांक ०४/०५/२०२६ रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईसाठी मुदत दिली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
धमक्या आणि मानसिक छळ: प्रशासनाकडे निवेदन दिल्याचा राग मनात धरून, कॉलेज प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थ्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
अतिरिक्त शुल्काची लूट: कॉलेजने मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांकडून जे कायदेबाह्य आणि नियमबाह्य अतिरिक्त शुल्क (Extra Fees) वसूल केले आहे, ते तात्काळ परत करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे.
"कॉलेजचे प्राचार्य आणि सचिव यांच्या मनमानी व आडमुठ्या धोरणामुळे जर विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झाले, किंवा त्यांच्या भविष्याला धोका निर्माण झाला, तर त्याला पूर्णपणे कॉलेजचे प्राचार्य, सचिव आणि संस्था प्रशासनच जबाबदार राहील," असा इशारा विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण कार्यालय), पोलीस अधीक्षक आणि प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प, अकोला) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.