

वाशिम : मोटारसायकलला 'कट' मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका युवकावर आणि त्याच्या नातेवाईकांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशिम येथे घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, एकूण चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक राजेश राऊत हे आपल्या आई आणि लहान मुलासह बाहेती हॉस्पिटलसमोरून जात असताना, जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील एका मोटरसायकल गॅरेजच्या मालकाने त्यांच्या गाडीला 'कट' मारला. याबाबत प्रतिक यांनी जाब विचारला असता, गॅरेज मालकाने शिवीगाळ करत "हा रस्ता माझा आहे" असे म्हणत वाद घातला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले. यावेळी गॅरेजमधील काही महिलांनी प्रतिक यांच्या आई लक्ष्मीबाई राऊत यांना मारहाण केली, ज्यामध्ये त्यांचा हात फॅक्चर झाला. जखमी आईला घेऊन प्रतिक रुग्णालयाकडे रवाना झाले.
गॅरेजवर जाऊन जाब विचारला असता हल्ला
काही वेळाने प्रतिक राऊत, त्यांचा भाऊ प्रविण राऊत, अंकुश सोनटक्के आणि सुरज जोगदंड हे पुन्हा त्या गॅरेजवर गेले आणि आईला का मारहाण केली, असा जाब विचारला. यावेळी गॅरेजमधील ५ ते ६ जणांसह त्यांच्या इतर नातेवाईकांनी मिळून या चौघांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढवला. भांडण सोडवण्यासाठी आलेले राजेश राऊत यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
पोलीस कार्यवाही
या भीषण हल्ल्यात प्रतिक राऊत यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने गंभीर वार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रतिक राऊत, अंकुश सोनटक्के आणि सुरज जोगदंड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली असून, याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.