

वाशिम : ग्रामपंचायतीच्या अधिकृत खुर्चीवर बसून 'दबंगगिरी' करणे सरपंच पुत्राला चांगलेच महागात पडले आहे. आपल्या मुलाला ग्रामपंचायतीच्या कामकाजात बेकायदेशीर हस्तक्षेप करू दिल्याने वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील सरपंच गोदावरी सारंगधर काळे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अमरावती विभागाचे अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, यामुळे ग्रामीण राजकारणात नातेवाईकांच्या हस्तक्षेपाला चाप बसला आहे.
भटउमरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गोदावरी काळे यांची सरपंच पदी थेट जनतेतून निवड झाली होती. मात्र, १८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांचा मुलगा हरीभाऊ काळे याने चक्क सरपंच आणि सचिवांच्या खुर्चीवर बसून कार्यालयीन कामकाजात ढवळाढवळ केली होती. या 'राजेशाही' कारभाराची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत (CEO) सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशी अहवालातून धक्कादायक बाबी समोर आल्या. सरपंच पुत्राने अधिकृत खुर्चीवर बसून अनेक निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. सरपंचांनी आपल्या मुलाला या बेकायदेशीर कृत्यापासून रोखण्याऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. हे कृत्य शासन परिपत्रकातील (झेडपीए: १००५/९४) मार्गदर्शक सूचनांचे थेट उल्लंघन असल्याचे सिद्ध झाले.
अपर आयुक्तांनी या प्रकरणातील सर्व पुरावे आणि साक्षी तपासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) नुसार कारवाई केली. पदाचा दुरुपयोग आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गोदावरी काळे यांना सरपंच व सदस्य अशा दोन्ही पदांसाठी अपात्र घोषित करण्यात आले.
या प्रकरणात केवळ सरपंचांवरच नाही, तर या बेकायदेशीर कृत्यास अटकाव न करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत आदेशात देण्यात आले आहेत.
लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या कडक पावलामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ‘सत्ता मिळाली म्हणजे ती कुटुंबाची खाजगी मालमत्ता नाही,’ असाच संदेश या निकालातून गेला असल्याची चर्चा आता रंगली आहे.