

वाशिम : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान वाशिम मतदार संघातील शेतशिवाराची प्रत्येक्ष पाहणी केली. आजच्या नियोजित दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतशिवाराची पाहणी करण्यात आली. दुपारी 12.30 वा. पांडव उमरा - तांदळी शेवई (ता. जि. वाशिम) येथील शिवारात पीक पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतात उतरून सोयाबीन पिकाच झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
शेतकऱ्यांनी मांडली कैफियत -
पांडव उमरा - तांदळी शेवई येथे शेतकऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. सोयाबीन पूर्णपणे हातातून गेले आहे, या दुष्काळात पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही, पीक विम्याचे पैसे खात्यात जमा झाले नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. सरकार केवळ घोषणा करते, प्रत्येक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी रडतं-रडतं केला.
यावेळी या शिवारातील शेतकरी विष्णु भालेराव यांना त्यांचे शेतातील सोयाबीन सोंगण्याची इच्छा झाली नाही कारण सोंगण्याचाही खर्च निघत नाही.तर विकास कालापाड ह्या शेतकऱ्याचा मुलगा ढसा-ढसा रडतं होता .
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "विदर्भातील शेतकरी संकटात आहे, सरकार झोपले आहे. आम्ही हा आवाज विधानसभेत आणि रस्त्यावर उठवू .शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे." या दौऱ्यात आमदार अमित झनक, राजुभाऊ चौधरी अध्यक्ष, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी, अॕड दिलीपराव सरनाईक प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस कमिटी, यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेत मजूर व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.