

वाशिम : वाशिम शहरात नगर परिषदेकडून गेल्या १३ दिवसांपासून सातत्याने गढूळ आणि गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच, पण घरगुती वापरासाठीही धोकादायक ठरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
शहरातील गणेश पेठ, गोपाल टॉकीज परिसर आणि इतर अनेक भागांमध्ये नळाला येणारे पाणी अत्यंत गढूळ आणि गाळयुक्त आहे. या पाण्यामुळे घशाचे संक्रमण, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी नगरपालिकेची यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून नालेसफाईचा अभाव, अपुरे पाणी शुद्धीकरण आणि जलवाहिनीमध्ये साचलेला गाळ या कारणांमुळे पाणीपुरवठा निकृष्ट दर्जाचा होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत आहेत. मात्र, या तक्रारींकडे नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल न घेतल्यास आणि या पाण्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी नगरपालिका जबाबदार असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.