Washim accident | मेडशी बायपासवर भीषण अपघात; 10 महिला मजूर जखमी...

या घटनेमुळे मेडशी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे
Washim accident | मेडशी बायपासवर भीषण अपघात; 10 महिला मजूर जखमी...
Published on
Updated on

वाशिम : वाशिम-अकोला महामार्गावरील मेडशी बायपासजवळ आज (दि.३०) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात हळद काढणीच्या कामासाठी जाणाऱ्या १० महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. ३०) सकाळी ठीक ७:00 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मेडशी येथील काही महिला मजूर जवळच असलेल्या रिधोरा येथे हळद काढणीच्या कामासाठी जाण्यासाठी 'मॅक्झिमो' (MH-08-AG-0967) या वाहनात बसून होत्या. हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे असतानाच, वाशिम कडून अकोल्याच्या दिशेने अत्यंत वेगाने जाणाऱ्या टाटा हॅरियर कारने (GJ-19-BJ-2000) या उभ्या वाहनाला पाठीमागून भीषण धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, टाटा हॅरियर कार रस्त्यावरच उलटली, तर उभ्या असलेल्या वाहनाचाही मोठा चक्काचूर झाला. यामध्ये वाहनात बसलेल्या १० महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमी महिलांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वाशिम आणि अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमी महिला मेडशी येथील रहिवासी असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीच्या कामाला जात असताना त्यांच्यावर हा काळाने घाला घातला. या घटनेमुळे मेडशी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील वाहनांच्या वाढत्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news