

वाशीम: रिसोड शहर आणि परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात रिसोड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातून चोरलेल्या ८ लाख २५ हजार रुपये किमतीच्या एकूण १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर, ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी. बी. पथकाला चोरांचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, डी. बी. पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला.
९ सप्टेंबर २०२५ रोजी, पथकाने संशयित आरोपी मयुर प्रविण नवले (वय २१) आणि गजानन उर्फ गणेश बळीराम गायकवाड (वय १८), दोघेही (रा. माणुसकी नगर, रिसोड) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील रिसोड, वाशिम शहर, मेहकर आणि लोणार पोलीस स्टेशन हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
रिसोड पोलिसांनी गेल्या एका महिन्यात धडाकेबाज कामगिरी केली आहे. यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. आताच्या कारवाईमुळे एका महिन्यातील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १० लाख २१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे.
ही उत्कृष्ट कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक लता फड, आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदिप अग्रवाल (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रिसोडचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू, संजय रंजवे, आशिष पाठक, तसेच पोलीस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे, सुनिल तिवाले, प्रविण गोपनारायण, आणि विश्वास चव्हाण यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.