

वाशिम: यावर्षी खरीप हंगामापासूनच 'जगाचा पोशिंदा' म्हणून ओळखला जाणारा शेतकरी संकटात सापडला आहे. मे २०२५ ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, उत्पन्न मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एकलसपूर येथील शेतकरी गजानन काशिनाथ चोपडे यांनी हताश होऊन आपल्या उभ्या कपाशीच्या पिकात रोटावेटर फिरवला असल्याची खेदजनक माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्पन्नाची हमी राहिली नसल्यामुळे शेतकरी गजानन चोपडे यांनी हे कठोर पाऊल उचलले. एकलसपूर येथील शाम फुंड यांच्याकडून त्यांनी 'शिड'चे कपाशी बियाणे खरेदी केले होते, मात्र बियाणे घेताना दिलेले आश्वासन कंपनीने आता विसरले आहे.
शेतकऱ्याचा आक्रोश मला आतापर्यंत ४० ते ४५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पायाच्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असल्याने कसाबसा काठीच्या आधाराने चालतो. निसर्गाचा कोप झाला आहे. बळीराजा किती संकटांना तोंड देणार? तो मेटाकुटीला आला आहे.
गजानन चोपडे, शेतकरी
रिसोड तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या एकलसपूर शिवारात हे चित्र दिसत आहे. पुढे कसे जगावे, याची मोठी विवंचना शेतकऱ्यांसमोर उभी आहे. याच चिंतेतून युवा शेतकरी गजानन चोपडे यांनी ९ ऑक्टोबर रोजी गट नं ७६/४ मधील आपल्या अर्धा एकर शेतात लावलेल्या कपाशीच्या पिकात रोटावेटर घातला. काढणीचा काळ जवळ आला, तरी उत्पादन खर्चही निघणार नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी 'क्रसिंग'चे बियाणे वापरले होते, मात्र आता कंपनी साधी विचारपूस करायलाही तयार नाही. सुमारे ४० हजार रुपये खर्च झाले आहेत. आधीच नगदी पीक असलेले सोयाबीन हातातून गेले. काढणीसाठी कोणी बटाईनेसुद्धा (कंत्राटी) घ्यायला तयार होत नाहीये.
यावर्षी मान्सूनमध्ये पाऊस तर झालाच, पण पिकांवरील फवारणीसाठी महागडी औषधेही वापरावी लागली. उत्पादन तर बुडालेच, उलट फवारणीमुळे खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. साधारणपणे एकरी ३० ते ४० क्विंटलचा उतार अपेक्षित असतो, मात्र यावर्षी कपाशीला कोणतेही फुल किंवा बोंड आलेले नाही. क्रसिंगचे बियाणे वापरल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच साजरी होणार आहे.